नाटक या साहित्यप्रकाराचा अभ्यास

 








प्रस्तावना

एक लोकप्रिय साहित्यप्रकार म्हणून नाटकाचा उल्लेख करावा लागेल. मात्र इतर साहित्य प्रकाराहून (कथा, कांदबरी, कविता इ.) नाटक हा साहित्यप्रकार कसा वेगळ ठरतो ते लक्षात घेणे आवश्यक ठरते. त्यासाठी नाटक म्हणजे काय हा विचार महत्वाचा ठरतो.

 "नाटक म्हणजे काय?"

नाटक हा इतर साहित्यप्रकारांपेक्षा पूर्णपणे वेगळा साहित्य प्रकार आहे, कारण नाटक ही सादरीकरणाची, दाखवण्याची कला (Art of Performing) आहे. ती प्रयोगनिष्ठ आहे. इतर साहित्यप्रकारांत साहित्य आणि वाचक असे दोनच घटक असतात. या दोनच घटकांमध्ये आस्वादप्रक्रिया पूर्ण होते. पण नाटकामध्ये नाटक, ते नाटक करणारे अभिनेते व रसिक असा प्रवास असतो प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळल्यावरच नाटकाची आस्वादप्रक्रिया पूर्ण होते नाटक हे 'दृक्श्राव्य' असते. नाटकाला एक संहिता असते पण रंगमंचावर अवतरल्याशिवाय नाटक पूर्ण होत नाही. नाटकांत अनेक कलांचा समावेश झालेला असल्यामुळे त्याला 'संमिश्रकला' असेही म्हटले जाते.

उदा. नृत्य, संगीत, शिल्प, चित्र, वास्तू इ. नाटकाच्या महत्वाच्या घटकांमध्ये नेपथ्य, संगीत आणि प्रकाश योजना या गोष्टी येत असल्यामुळे नाटक अतिशय प्रभावी आणि परिणामकरारक होऊ शकते.

भारतात 'नाटक' ही कला अतिशय प्राचीन म्हणजे सुमारे दोन हजार वर्षापासून अस्तित्वात आहे. 'भरतमुनींना' भारतीय नाट्यकलेचे जनक मानले जाते. त्यांचा नाटकावरील इत्यंभूत माहिती देणारा 'नाट्यशास्त्र' हा ग्रंथ प्रमाण मानला जातो. त्याबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की, भरतमुनींनी ऋग्वेदातून पाठ्यतत्त्व, सामवेदातून गायनतत्त्व, यजुर्वेदातून अभिनयतत्त्व आणि अथर्ववेदातून रसतत्त्व घेतले. याप्रमाणे चारही वेदातून महत्वाचे भाग घेऊन 'नाट्यशास्त्र' हा ग्रंथ लिहिला. म्हणूनच 'नाट्यशास्त्र' या ग्रंथाला 'पंचमवेद' (पाचवा वेद) असेही म्हणतात.

सर्वसामान्य लोकांना धर्मतत्व कळावे यासाठी संगीत नृत्य आणि इतर कलांनी युक्त असे नाटक त्यांनी रचले. दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड देऊन त्रासलेल्या लोकांना आनंद वाटवा, त्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून ब्रम्हदेवांनी हा नाटयवेद निर्माण केला आणि भरतमूनींकडे अभिनयासाठी सुपूर्द केला. भरतमूनींनी मग आपले शंभर शिष्य, स्वर्गातील अप्सरा, यक्ष, किन्नर, गंधर्व गायन विद्येत पारंगत नारादमुनी यांच्या मदतीने ब्रम्हदेवाच्या आज्ञेनुसार, इंद्रदेवाच्या ध्वजमहोत्सवप्रसंगी 'दैत्यदानवनाशन' नाटकाचा प्रथम प्रयोग सादर केला. आनंद देणे, मनौरंजन करणे हेच नाटकाचे महत्वाचे प्रयोजन आहे. नाटक हे सर्वासाठी आहे याविषयी भरतमूनी म्हणतात, "दुःखार्तानां, श्रमार्तानां, शोकार्तानां तपस्विनाम् । विश्रामजननं लोके नाट्यमेतद् भविष्यति ।। "(म्हणजेच नाटक दु: खी, श्रमिक, तपस्वी, राजा, सेवक सर्वांसाठी आहे.)

नाटक ही जीवनाची अनुकृती आहे हे भरतमुनींना ज्ञात होते त्यामुळे 'दैत्यदानवनाशन' नाटकाच्या प्रत्येक प्रयोगांत आपलाच पराभव होतो हे बघून चिडलेल्या दानवांचे सांत्वन करताना भरतमूनींनी त्यांना पटवून दिले, नाटक म्हणजे तत्त्वतः भावन नाही. त्रैलोक्यातील सर्व भावनांची हे 'अनुकृती' (Imitation) आहे. म्हणजेच जगातील सर्व प्रकारच्या अनुभवांचे अभिनयांच्या आधारे अनुकरण म्हणजे नाटक, भरतमुनी म्हणतात, जगात सुख आणि दुःखाचे विविध अनुभव येतात. त्यांचे अभिनयाने नाटकात सादरीकरण केले जाते. भरतमूनीच्या मते, असा कोणताही अनुभव जगात नाही त्याचे सादरीकरण नाटकात करता येणार नाही.

 

अॅरिस्टॉटल

भारतीय संस्कृतीत भरतमुनींना जो मान आहे तोच मान ग्रीक संस्कृतीत अॅरिस्टॉटलाला आहे. ग्रीक मध्ये अॅरिस्टॉटल याने सुमारे दीड हजार वर्षापणीं 'पोएटिक्स' नावाचा ग्रंथ लिहिला आणि नाट्यविषयक स्वरूपाविषयी चर्चा केली. अॅरिस्टॉटने नाटकाचे दोन प्रकार सांगितले आहेत.

१. सुखात्मिका किंवा सुखातिका (comedy) २. शोकात्मिका किंवा शोकांतिका (Tragedy)

मानवी जीवन हे सुख आणि दुःख यांनी बनलेले असल्यामुळे अॅरिस्टॉटलच्या मते नाटकात जीवनाची अनुकृती असल्यामुळे या दोन्ही भावना त्यात अभिनित होतील हेच स्वाभाविक आहे.

नाटक या साहित्यप्रकाराचे स्वरूप-

नाटक हा साहित्यप्रकार कथनापेक्षा कृती व संवादावर आधारित असतो. तो केवळ वाचण्यापुरता मर्यादित नसून रंगभूमीवर सादर होण्यासाठी लिहिला जातो. काव्य व कादंबरी यांसारख्या इतर साहित्यप्रकारात वाचक एकटा रस घेतो; परंतु नाटकाचा खरा आनंद प्रेक्षकांसमोर सादरीकरणातून मिळतो.

कथानकातून घटनांची मांडणी, संघर्ष व उत्कर्षबिंदू यावर नाटक उभे राहते. पात्र म्हणजे नाटकातील कृती घडविणारी व्यक्तिमत्त्वे शिवाय त्यांच्या संवादातून व कृतीतून कथानक पुढे सरकते असते. संवाद हा नाटकाचा प्राण असते, कारण संवादातून पात्रांचे विचार, स्वभाव, भावना आणि संघर्ष स्पष्ट होतो. कृती देखील नाटकात ‘दाखविणे’ हे महत्त्वाचे असते. पात्रांची हालचाल, घटना व प्रसंगातून कथा जिवंत होत असते.. रंगमंचीयता अर्थात नेपथ्य, वेशभूषा, प्रकाशयोजना, संगीत, अभिनय या घटकांशिवाय नाटक पूर्ण होत नाही.

नाटकाची संकल्पना, नाटकाची दोन रुपे- संहिता व प्रयोग

नाटक हा साहित्यप्रकार संवाद, कृती आणि रंगमंचीय सादरीकरण यांवर आधारलेला आहे. तो केवळ वाचण्यापुरता नसून रंगभूमीवर सादर होण्यासाठी लिहिला जातो. कादंबरी, कविता यांसारख्या इतर साहित्यप्रकारात वर्णन वाचकाला वाचनातून अनुभवावे लागते; पण नाटकात घटना, पात्रे, संघर्ष हे सर्व प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर घडते. त्यामुळे नाटक हा साहित्य व रंगकला यांचा संगम मानला जातो.

साहित्यातील रूपे-

साहित्याची रूपे म्हणजे साहित्य व्यक्त होण्याची वेगवेगळी अभिव्यक्तीची माध्यमे वा प्रकार. प्रत्येक रूपाची स्वतःची रचना, भाषा, आशय व उद्दिष्टे वेगळी असतात. नाटक, काव्य, कथा, कादंबरी, निबंध इत्यादी साहित्यातील मुख्ये रूपे आहेत.

नाटकाची दोन रुपे- संहिता व प्रयोग

भारतातील शास्त्रीय नाट्यपरंपरेत भरतमुनींच्या ‘नाट्यशास्त्रात’ संहितेचे महत्त्व सांगितलेले आहे. मराठी रंगभूमीवर विष्णुदास भावे, राम गणेश गडकरी, विजय तेंडुलकर यांची नाटके त्यांच्या संहितेमुळे आजही अभ्यासली जातात. नाटक हा साहित्यप्रकार संवाद व कृतीप्रधान असून त्याची दोन रूपे मानली जातात.

1.        संहिता

2.       प्रयोग.

 

संहिता म्हणजे नाटकाचे लेखबद्ध रूप. प्रयोग होण्यासाठी संहिता ही पायाभूत व आवश्यक गोष्ट आहे तर, प्रयोग म्हणजे नाटकाचे रंगमंचीय सादरीकरण होय.

१. संहिता-

संग्रहित केलेली व व्यवस्थित मांडलेली गोष्ट. म्हणजे ‘संहिता’ होय. नाटकाच्या संदर्भात संहिता म्हणजे नाटकाचा लेखबद्ध आराखडा किंवा Script. संहितेत लेखक आपले विचार, कथा, पात्रांची संवादरचना व प्रसंगांची बांधणी करतो. संहिता वाचकाला व प्रेक्षकाला नाटकाची कल्पना देणारी असते, मात्र रंगमंचीय प्रयोग झाल्याशिवाय ती अपूर्ण राहते.

संहितेचे महत्त्व-

1.        नाटकाचा पाया – संहिता नसल्यास नाटकाचा प्रयोग शक्य नाही.

2.       कलाकारांसाठी मार्गदर्शक – संवाद, कृती, रंगसूचना यामुळे कलाकारांना अभिनयाची दिशा मिळते.

3.       दिग्दर्शकासाठी साधन – दिग्दर्शकाला नाटकाची कल्पना, वातावरण, गती व रचना समजते.

4.       प्रेक्षकांसाठी आशय – नाटकाचा मूळ आशय, विचार व संदेश संहितेतून उलगडतो.

5.       साहित्यिक मूल्य – संहितेला वाचनीय रूप असल्यामुळे ती साहित्य म्हणूनही स्वतंत्र महत्त्वाची ठरते.

2. प्रयोग-

            नाटक ही दोन रूपांत दिसते. संहिता (लिखित स्वरूप) व प्रयोग (मंचावरील सादरीकरण).

संहितेला रंगमंचावर नेऊन प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर दृश्य-श्राव्य रूपात सादर करणे म्हणजे प्रयोग. नाटकाचे खरे अस्तित्व प्रयोगात असते; कारण प्रेक्षक नाटकाचा आनंद संहितेऐवजी प्रत्यक्ष सादरीकरणातून घेतात.

1.        प्रयोगाचे घटक

2.       संहिता (Script): कथानक, पात्रे, संवाद.

3.       दिग्दर्शन (Direction): संहितेचे रंगमंचावर रूपांतर करणारा प्रमुख घटक.

4.       अभिनय (Acting): पात्रांचे जिवंत सादरीकरण – संवाद, हावभाव, देहबोली.

5.       संवाद (Dialogue Delivery): स्पष्टता, भावपूर्णता आणि प्रेक्षकांवर परिणाम.

6.       नेपथ्य (Stage Setting): रंगमंचावरील सजावट, पडदे, वस्तू, पार्श्वभूमी.

7.       वेशभूषा व रंगभूषा (Costume & Make-up): पात्रांचा स्वभाव, काळ आणि वातावरण दाखवणारे साधन.

8.       प्रकाशयोजना (Lighting): वातावरण निर्मितीसाठी प्रकाशाचा वापर.

9.       संगीत व ध्वनी (Music & Sound Effects): प्रसंगाचा भावनिक परिणाम वाढवणे.

10.    प्रेक्षकांचा सहभाग (Audience Response): प्रयोगाचे यश प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेतून दिसते.

प्रयोगाचे महत्त्व-

            संहितेतील विचार, संदेश, भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. प्रयोगामुळे नाटकाला दृश्यात्मक आणि श्राव्य जीवन मिळते. प्रेक्षकांना थेट रसास्वाद होतो. दिग्दर्शक, अभिनेते, नेपथ्यकार, संगीतकार यांचा सामूहिक प्रयत्न एकत्र आणतो. नाटकाची खरी कसोटी म्हणजे त्याचा यशस्वी प्रयोग. नाटकातील प्रयोग म्हणजे संहितेला रंगमंचावर प्रेक्षकांसमोर जिवंत करणे. प्रयोगाशिवाय नाटक अपूर्ण आहे. संहितेचा आत्मा प्रयोगातूनच प्रकट होतो.

नाट्य संहितेतील घटक-

1. कथानक-

            नाटक हा साहित्यप्रकार संवाद व कृतीप्रधान आहे. या कृतीला दिशा देणारे आणि नाटकाची सांगड बांधणारे महत्त्वाचे घटक म्हणजे कथानक. कथानकाशिवाय नाटकाचा आकारच ठरत नाही. म्हणून कथानक नाटकाचे हृदय मानले जाते.

कथानकाची व्याख्या-

            कथानक म्हणजे नाटकातील घटनांची क्रमबद्ध मांडणी होय. त्या घटनांमध्ये पात्रे एकमेकांशी संवाद साधतात, संघर्ष घडतो, उत्कर्षबिंदू येतो आणि शेवटी समाधानकारक उपसंहार होतो. अरिस्टॉटलने आपल्या ‘Poetics’ मध्ये कथानकाला नाटकाचे मुख्य अंग मानले आहे.

नाटकातील कथानकाची वैशिष्ट्ये-

1.        सलग घटनाक्रम – प्रसंग व घटना एकमेकांशी जोडलेल्या असाव्यात.

2.       संघर्षप्रधानता – पात्रांमधील संघर्ष किंवा परिस्थितीजन्य संघर्ष कथानक पुढे नेतो.

3.       उत्कर्षबिंदू – कथानकात ताणतणावाची पराकाष्ठा गाठून उत्कर्षबिंदू निर्माण होतो.

4.       उपसंहार – शेवटी संघर्षाचा निरास होऊन नाटकाचा शेवट ठरतो.

5.       नाट्यमयता – कथानक वाचक वा प्रेक्षकाला खिळवून ठेवणारे असावे.

2. कथानकाचे प्रकार-

1.        साधे कथानक (Simple Plot): एकाच संघर्षाभोवती फिरणारे. उदा. शोकांतिका.

2.       संयुक्त कथानक (Complex Plot): अनेक संघर्ष व उपकथानक असलेले.

उदा. ऐतिहासिक किंवा सामाजिक नाटके.

कथानकाचे महत्त्व-

            नाटकाला आकार व दिशा देणारे घटक कथानकामध्ये सापडतात. कथानाकामुळेच पात्रांच्या कृती व संवादांना सुसूत्रता मिळते. प्रेक्षकांचे लक्ष वेधून ठेवण्याचे साधन म्हणून कथानक महत्वाची भूमिका निभावते. याशिवाय नाटकाचा विचार, संदेश व रस कथानकातूनच उलगडतो.

 थोडक्यात, नाटकातील कथानक म्हणजे घटना, प्रसंग व संघर्षांची सुसंगत मांडणी होय. ते नाटकाचा सांगाडा, आत्मा आणि जिवंतपणा देणारे घटक आहे. कथानकाशिवाय नाटक शक्य नाही, कारण कथानकच नाटकाला प्रवाहीपणा, उत्कंठा आणि प्रभावीपणा देऊन प्रेक्षकांवर परिणाम घडवते.

पात्रे व संवाद –

            नाटकातील पात्रे म्हणजे कथानकातील व्यक्तीरेखा ज्या संवाद व कृतीमधून कथानक उभारतात. तसेच पात्रांशिवाय नाटक अस्तित्वात येत नाही पात्रांचे बोलणे, त्यांच्या भावभावना व स्वभाव उलगडणारे संवाद यातूनच नाटक संपन्न होत असते.

नाटकातील पात्रे-

1.        कथानकाला पुढे नेणारी – पात्रांच्या वर्तन, संवाद आणि संघर्षामुळे नाटक पुढे सरकते.

2.       स्वभाववैशिष्ट्यपूर्ण – प्रत्येक पात्राची भाषा, विचार, कृती व मानसिकता वेगळी असते.

3.       जीवनप्रतिबिंब – पात्रांतून समाजातील व्यक्तींचे वास्तव चित्र दिसते.

4.       मुख्य व गौण पात्रे – नायक, खलनायक, नायिका, उपपात्रे अशा विभागात त्यांची भूमिका वेगळी असते.

5.       प्रेक्षकांवर परिणाम करणारी – पात्रांच्या स्वभावामुळे प्रेक्षकांत सहानुभूती, राग, हसू किंवा भीती निर्माण होते.

            उदा. शेक्सपियरचा हॅम्लेट – द्विधा मनस्थिती असलेला नायक. विजय तेंडुलकरांच्या घाशीराम कोतवाल मधील घाशीराम आणि नाना – प्रभावी नाट्यपात्रे.

नाटकातील संवाद-

            संवाद म्हणजे पात्रांनी बोललेली वाक्ये होत. नाटकात वर्णन किंवा निवेदनाऐवजी संवादातूनच कथानक व विचार स्पष्ट होतात.

वैशिष्ट्ये-

1.        पात्रानुरूपता – पात्राच्या स्वभाव, वय, शिक्षण, संस्कार यानुसार संवाद असतो.

2.       संक्षिप्तता व प्रभावीपणा – संवाद छोटे पण आशयपूर्ण असतात.

3.       नाट्यमयता – संवादांमुळे उत्कंठा, ताण, विनोद किंवा करुणा निर्माण होते.

4.       उपपाठ (Subtext) – संवादात नेहमी स्पष्ट बोललेलेच नसते; कधी संकेत, उपरोध किंवा अंतर्गत भावना दडलेल्या असतात.

            संवादातून प्रसंग पुढे सरकतो, नाट्य लय टिकते. नाटकातील पात्रे म्हणजे कथानकाचे प्राण आणि संवाद म्हणजे त्या प्राणाला हालचाल देणारा श्वास. पात्रांशिवाय नाटक घडत नाही आणि संवादांशिवाय पात्रे उलगडत नाहीत.त्यामुळे पात्रे व संवाद हे नाटकाचे दोन अविभाज्य व मूलभूत घटक आहेत.

स्थळ-

            स्थळ म्हणजे नाटकातील घटना ज्या ठिकाणी घडतात ती जागा. नाटक रंगभूमीवर आणताना स्थळाची मांडणी, पार्श्वभूमी, सजावट यांचा विचार केला जातो. स्थळामुळे प्रेक्षकांना कथानकाचा संदर्भ कळतो. पात्रे कुठल्या वातावरणात आहेत याचा प्रभाव त्यांच्या वागणुकीवर, भाषेवर आणि घटनांच्या स्वरूपावर पडतो. स्थळामुळे वास्तवता आणि विश्वासार्हता नाटकाला प्राप्त होते.

स्थळाचे प्रकार-

1.        भौतिक स्थळ: नाटकात दाखवलेली प्रत्यक्ष जागा (उदा. दरबार, जंगल, घर, कारागृह, शाळा, बाजारपेठ).

2.       सांस्कृतिक/सामाजिक स्थळ: नाटकात दाखवलेले समाजाचे वातावरण (उदा. ग्रामीण, शहरी, राजदरबारी, धार्मिक स्थळ).

3.       मानसिक स्थळ: काही नाटकांमध्ये पात्राच्या मनातली अवस्था स्थळ म्हणून व्यक्त होते (उदा. एकाकीपणा दाखवण्यासाठी रिकामे मैदान).

उदाहरणे

1.        कालिदासाचे "अभिज्ञान शाकुंतलम्" – तपोवन, राजमहल, आश्रम अशी स्थळे कथानक पुढे नेतात.

2.       विठ्ठल उमाप यांचे "गिधाडे" – मध्यमवर्गीय कुटुंबाचे घर हेच केंद्रस्थानी असलेले स्थळ आहे.

3.       जयशंकर प्रसाद यांचे "चंद्रगुप्त" – राजदरबार आणि रणांगण ही स्थळे पात्रांच्या भूमिकेला बळकटी देतात.

रंगभूमीवरील उपयोग-

            स्थळ दाखवण्यासाठी रंगमंचावरील पडदे, सजावट, प्रकाशयोजना, ध्वनी यांचा उपयोग होतो. कधी कधी प्रत्यक्ष वस्तूंच्या साहाय्याने (खुर्च्या, टेबल, शस्त्र) तर कधी प्रतीकात्मक मांडणीने स्थळ दाखवले जाते.

नाटकातील काळ (Time):

            नाटकातील काळ म्हणजे कथानक ज्या वेळेत, कालखंडात किंवा कालमर्यादेत घडते तो घटक. नाटकातील घटना कोणत्या युगात, कोणत्या सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीत घडत आहेत हे प्रेक्षकांना समजण्यासाठी काळ महत्त्वाचा ठरतो.

नाटकातील काळाचे प्रकार

1.        ऐतिहासिक काळ (Historical Time): जे नाटक एखाद्या ऐतिहासिक घटनेवर आधारित असते त्यात विशिष्ट काळ दाखवला जातो. उदा. जयशंकर प्रसाद यांचे "चंद्रगुप्त" – मौर्यकालीन इतिहास.

2.       पौराणिक/काल्पनिक काळ (Mythological/Fantasy Time): जेव्हा कथानक पौराणिक कथा, आख्यायिका किंवा कल्पनेवर आधारित असते. उदा. कालिदासाचे "अभिज्ञान शाकुंतलम्" – पौराणिक वातावरण.

3.       आधुनिक काळ (Contemporary Time): जे नाटक तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक वास्तव दर्शवते. उदा. विजय तेंडुलकरांचे "सखाराम बाईंडर" – विसाव्या शतकातील शहरी मध्यमवर्गीय वास्तव.

4.       भविष्यकाळ (Future Time): काही नाटके कल्पित भविष्यकालीन जगावर आधारित असतात. उदा. विज्ञाननाटके किंवा युटोपियन/डिस्टोपियन स्वरूपाची नाटके.

5.       नाट्यमय/कृत्रिम काळ (Dramatic Time): रंगमंचावर प्रत्यक्ष वेळ संक्षिप्त करून दाखवली जाते. उदा. दोन तासांच्या नाटकात अनेक वर्षांचा प्रवास दाखवता येतो. काळ संक्षिप्त (compressed), विस्तृत (expanded) किंवा प्रतीकात्मक (symbolic) दाखवला जातो.

नाटकात काळाचे महत्त्व

1.        घटनांची सलगता: कथानक कुठे सुरू होते आणि कुठे संपते हे ठरवते.

2.       प्रसंगांची मांडणी: नाटकात सकाळ, दुपार, रात्र, ऋतू, वर्ष यानुसार प्रसंग बदलतात.

3.       पात्रांची वाढ/परिवर्तन: काळानुसार पात्रे प्रगल्भ, वृद्ध किंवा बदललेली दाखवता येतात.

4.       प्रेक्षकांचा अनुभव: काळामुळे नाटक वास्तवदर्शी, ऐतिहासिक किंवा काल्पनिक वाटते.

5.       नाट्यमय परिणाम: वेळेचे संक्षेपण व विस्तार प्रेक्षकांना उत्कंठा, ताण किंवा भावनिक परिणाम देतात.

उदा.

1.        "शकुंतल" (कालिदास) – पौराणिक काळ, ऋतूंचे बदल कथानक पुढे नेतात.

2.       "गिधाडे" (विठ्ठल उमाप) – समकालीन काळ, एका कुटुंबातील संघर्ष.

3.       "Waiting for Godot" (Samuel Beckett) – काळ अनिश्चित, प्रतीकात्मक; वेळ थांबलेली भासते.

4.       "चंद्रगुप्त" (जयशंकर प्रसाद) – ऐतिहासिक काळ.

            नाटकातील काळ हा संहितेचा अत्यावश्यक घटक आहे. काळामुळे घटना वास्तवदर्शी, प्रभावी व प्रेक्षकांच्या जवळच्या किंवा दूरच्या संदर्भात जाणवतात. काळाशिवाय कथानकाची सलगता, पात्रांची उभारणी आणि घटनांचा प्रभाव समजणे अशक्य आहे.

नाटकातील रस व भाव

रस-

            भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात "रस" ही संकल्पना महत्त्वाची मानली जाते. रस म्हणजे प्रेक्षकांनी अनुभवलेला सौंदर्यात्मक आनंद होय. पात्रांच्या कृती, वर्तन, संवाद, प्रसंग यांच्या माध्यमातून जेव्हा भाव व्यक्त होतात, तेव्हा प्रेक्षकांच्या मनात जो परिणाम निर्माण होतो, त्याला "रस" म्हणतात.

भरताचा रस सिद्धांत- “विभावानुभावव्यभिचारिसंयोगाद्रसनिष्पत्तिः”

            अर्थात, "विभाव, अनुभाव आणि संचारी भाव यांच्या संयोगातून रस उत्पन्न होतो."

भाव-

            भाव म्हणजे पात्राच्या आंतरिक भावनांची अवस्था. भाव हे पात्रांच्या मनात असतात; परंतु संवाद, हावभाव, नेपथ्य, संगीत यांमुळे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात.

नाट्यशास्त्रात भावांचे तीन प्रकार सांगितले आहेत.

1.        स्थायी भाव: नायकाच्या मनात कायमस्वरूपी असलेली भावना (उदा. प्रेम, करुणा, राग).

2.       संचारी भाव: तात्पुरते उमटणारे भाव (उदा. लाज, खिन्नता, भीती, शंका).

3.       व्यभिचारी भाव: कथानकानुसार बदलणारे, विविध प्रसंगांमध्ये उमटणारे भाव.

3. मुख्य रसांचे प्रकार (भरतमुनीनुसार ९ रस)

1.        शृंगार रस (प्रेमाचा रस) – प्रेम, सौंदर्य, मिलन व वियोग.

v  स्थायी भाव : रती (प्रेमभाव)

v  उदा. अभिज्ञान शाकुंतलम् मधील दुष्यंत-शकुंतलेचे प्रसंग.

2.       हास्य रस (हास्याचा रस) – विनोद, विनोदी प्रसंग.

v  स्थायी भाव : हास (हास्य)

v  उदा. विनोदी पात्रांची क्रीडा.

3.       करुण रस (दु:खाचा रस) – करुण प्रसंग, हानी, मृत्यू.

v  स्थायी भाव : शोक (दु:ख)

v  उदा. रामायण मधील सीतेचे विलाप.

4.       रौद्र रस (रागाचा रस) – क्रोध, युद्ध, संघर्ष.

v  स्थायी भाव : क्रोध (राग)

v  उदा. महाभारतातील युद्धदृश्ये.

5.       वीर रस (शौर्याचा रस) – शौर्य, साहस, पराक्रम.

v  स्थायी भाव : उत्साह (धैर्य)

v  उदा. शिवाजी महाराजांच्या नाट्यप्रसंगांत वीररस.

6.       भयानक रस (भीतीचा रस) – भय, संकट, जीविताचा धोका.

v  स्थायी भाव : भय

v  उदा. भुतांचे प्रसंग.

7.       बीभत्स रस (किळसवाणा रस) – घृणा, किळस.

v  स्थायी भाव : जुगुप्सा (किळस)

v  उदा. मृतदेह पाहून निर्माण होणारी भावना.

8.       अद्भुत रस (आश्चर्याचा रस) – आश्चर्य, कौतुक, चमत्कार.

v  स्थायी भाव : विस्मय

v  उदा. चमत्कारिक घटना, अप्रत्याशित परिणाम.

9.       शांत रस (शांतीचा रस) – आत्मशांती, समाधान.

v  स्थायी भाव : निर्वेद (वैराग्य, शांतता)

v  उदा. धार्मिक/आध्यात्मिक नाट्यप्रसंग.

रस व भाव यांचा संबंध-

            भाव हे नायक/पात्राच्या मनातील अंतर्गत अनुभव असतात. रस म्हणजे त्या भावांचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम. भावाशिवाय रस नसतो. उदा. पात्राच्या डोळ्यातून अश्रू (भाव) आले की, प्रेक्षकांच्या मनात करुणा (रस) जागृत होते. नाटकात भाव हे पात्रांच्या मनातील अंतर्गत भावना असून, त्यांचा परिणाम प्रेक्षकांच्या मनात रस म्हणून उमलतो. नाट्यकलेचे सर्वश्रेष्ठ ध्येय म्हणजे प्रेक्षकांना रसास्वाद देणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा